Thursday, May 6, 2010

पदार्थांचे गुणधर्मः उष्ण-शीत

गुण म्हणजे पदार्थाचा अंगभूत गुणधर्म. मग तो चांगला (शरीराला उपकारक) असो की वाईट (शरीराला हानिकारक), त्याला "गुण" च म्हटले जाते. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रांमध्ये पदार्थांचे वीस गुण सांगितले आहेत. त्यापैकी महत्वाचे दोन म्हणजे उष्ण-शीत. उष्ण म्हणजे बोलीभाषेत गरम आणि शीत म्हणजे थंड. (इथे पदार्थ स्पर्शाला म्हणजे हात लावुन पाहिल्यावर गार/गरम लागतो याचा काही संबंध नाही.)
एखादा पदार्थ उष्ण की शीत हे कसे ठरते?
१. स्वभावः प्रत्येक पदार्थ पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासुन बनलेला असतो. या पंचमहाभूतांचे गुणधर्म पदार्थात कमी-अधिक प्रमाणात येतात. उदा. जसे तेज महाभूत रुक्ष, तीक्ष्ण, उष्ण आहे. ज्या पदार्थामध्ये तेजोमहाभूताचे आधिक्य असते तो पदार्थ (उदा. मिरे) साधारण तसेच गुणधर्म दाखवतो. उष्ण पदार्थांमध्ये तेज व वायू महाभूतांचे आधिक्य असते. शीत पदार्थांमध्ये जल, आकाश आणि पृथ्वी महाभूताचे अधिक प्रमाण असते.
२. परिणामः त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम हे पदार्थाचे गुण ठरवण्याचा महत्वाचा निकष आहे.
आयुर्वेदातील व्याख्येप्रमाणे, सर्वसाधारणपणे ज्या पदार्थाचे सेवन केल्याने शरीराची/शरीराच्या एखाद्या भागाची आग होते, तहान लागते, घाम येतो, चक्कर-ग्लानि येते तो पदार्थ उष्ण समजावा. याउलट ज्या पदार्थाने थंड वाटते, वाहणारे रक्त थांबते अर्थात रक्तवाहिन्यांचा संकोच होतो, शरीराची होणारी आग कमी होते, तहान शमते तो पदार्थ शीत समजावा.
शास्त्रकारांनी या गुणधर्माचे वर्णन हजारो वर्षांपुर्वी करुन ठेवले आहे. पदार्थातील पंचमहाभूतांचे कॉम्बिनेशन आजही तसेच आहे. त्यामुळे इतक्या वर्षापुर्वी केलेला अभ्यास जुना झाला, आता नव्याने गुणधर्मांचा अभ्यास व्हायला हवा असे म्हणणे फोल आहे.
प्रत्येक पदार्थ एकतर उष्ण असतो किंवा थंड असतो, अर्थातच उष्णतेचे/शैत्याचे प्रमाण वेगवेगळ्या पदार्थात कमी-अधिक असते. जसे की हिरवे मूग हे किंचित उष्ण आहेत तर मिरे अति-उष्ण आहेत. सुंठ बर्‍यापैकी उष्ण आहे. हे तर-तमत्व पदार्थाच्या पांचभौतिक कॉम्बिनेशननुसार येते. (वेगळे उदाहरण घ्यायचे झाले तर आपण म्हणतो ना आज हवामान गरम आहे/कमी गरम आहे/ गरम नाहिये पण थंडीही नाहिये/ खूप थंड हवामान आहे तसंच काहीसं.)
आता वर म्हटले तसे हे गुण म्हणजे पदार्थाचा स्वभाव आहे. एकाच पदार्थातील गुणाचे तारतम्य हे प्रामुख्याने दोन घटकांमुळे बदलते.
१.त्या पदार्थावरील संस्काराने: जसे दही उष्ण आहे. त्यामध्ये पाणी मिसळुन घुसळणे हा अन्नसंस्कार केला असता तयार होणारे ताक हे दह्यापेक्षा कमी उष्ण असते (दह्यापेक्षा कमी उष्ण असले तरी ताक उष्णच आहे).
२. तो पदार्थ सेवन करणार्‍या शरीराची प्रकृती आणि अवस्था:
प्रकृती:- मुळातच पित्ताधिक प्रकृतीच्या व्यक्तीला तुरीची डाळ/दही कधीही, कशाबरोबरही खाल्ले तरी उष्ण पडते.
अवस्था:- शरीरात कफदोषाचे आधिक्या झाले असता (जो मुळात थंड, गुरु अशा गुणांचा आहे) मिरे हे तितके उष्ण पडत नाहीत. कारण त्यातील उष्णत्व हे वाढलेल्या कफाचे पारिपत्य करण्यात खर्ची पडते. याउलट शरीरात उष्णता आधीच वाढलेली असताना घेतले गेलेले साधारण उष्ण द्रव्यही (जसे तिळ-गुळ) बाधते (शरीराला उष्ण पडते). यावरुन लक्षात येते की एखादा पदार्थ केवळ उष्ण किंवा थंड म्हणुन चांगला किंवा वाईट असे वर्गीकरण करणे अशक्य आहे. गरजेनुसार, योग्य प्रमाणात वापरलेली दोन्ही गुणांची द्रव्ये शरीराला तितकीच फायदेशीर आहेत.
३. काळ (अर्थात दिवसाची/ऋतूची अवस्था): भर उन्हाळ्यात तिळगुळाची पोळी किंवा दुपारच्या वेळी आवड म्हणून सूपवर घातलेली किंचितशी मिरपूड उष्ण पडु शकते. तसंच थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी खाल्लेला पेरु थंड पडतो.
४. शरीराच्या विशेष अवस्था जसे आजारपण किंवा गरोदरपण: या अवस्थांमध्ये अतिउष्ण आणि अतिथंड अशा दोन्ही गुणांनी युक्त पदार्थांचा वापर टाळावा. याबाबतच्या काही सामान्य गैरसमजुती पुढीलप्रमाणे:
लहान मुलांना केळे खायला देणे, विशेषतः रात्रीच्या वेळी. लहान मुलांमध्ये आधीच कफ दोषाचे आधिक्य असते. त्यात रात्रीच्या वेळी (जेव्हा वातावरणात शीत गुणाचे आधिक्य असते) तेव्हा केळी खाल्ल्यास मुलांना श्वसनसंस्थेशी निगडीत आजार बळावतात जसे सर्दी, खोकला, बाळ-दमा.
गरोदर स्त्रियांनी बदाम, खजुर, केशर असे पदार्थ नियमित खाणे: ह्या उष्ण पदार्थांच्या सेवनाचा बाळाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होउ शकतो.
आता नेहमी आहारात येणारी अन्न/औषधी द्रव्ये साधारणपणे उष्ण की शीत ते पाहू.
उष्ण द्रव्ये:
करडई, चुका, मेथी, कारले, वांगे, आंबा, फणस, कवठ, टोमॅटो, ताक, दही, खोबरे, गुळ, तीळ, हिंग, मोहरी, ज्वारी, बाजरी, कुळीथ, उडीद, लसुण, खजूर, तेल, मद्य, सुंठ, मिरे, जिरे, वेलची, ओवा, बदाम, खारीक, जायफळ, अक्रोड, केशर, डिंक, आंबा, पपई, टरबुज, चिंच, जीरे, लवंग इ.
शीत द्रव्ये:
दुध, तूप, लोणी,मध, पाणी, नारळाचे पाणी, उसाचा रस, चिक्कु, सीताफळ, केळे, पेरु, द्राक्षे, सफरचंद, चंदन, वाळा, जेष्ठमध, तांदुळ, नाचणी, लाह्या, बटाटा, रताळे, काकडी, मनुका, सब्ज, गुलकंद, धणे इ.
उष्ण-शीत गुणांबद्दलच्या माहितीची उपयुक्तता: आयुर्वेद हे एक प्रत्यक्षपर शास्त्र आहे. म्हणजेच त्यातील कुठल्याही संकल्पनेचे ज्ञान व्यवहारात उपयुक्त ठरते. उष्ण आणि शीत हे परस्परविरोधी गुण आहेत. शरीरातील उष्णता वाढली असता शीत गुणाचे औषध वापरावे लागते. तसेच शरीरातील शीत गुण वाढला असता उष्ण द्रव्याने त्याचे निराकरण होते. एखाद्या व्यक्तीला डोळ्याला रांजणवाडी येउन डोळ्याची आग होत असेल तर घरात उपलब्ध असलेले थंड द्रव्य/औषध (जसे ज्येष्ठमध, तूप, लोणी) वापरुन लगेच उपचाराला सुरुवात करता येते.त्याचप्रमाणे काही वेळा वयस्कर माणसांचे एसीमध्ये जाउन आल्यावर पाय दुखतात. अशा वेळी थंड गुणाने झालेल्या या त्रासावर लगेच शेकणे हा गरम उपाय करता येतो. आधीच अ‍ॅसिडिटी होण्याची शरीराची प्रवृत्ती माहीत असेल तर त्या दृष्टीने गरम पदार्थांचे जाणीवपुर्वक कमी सेवन केले जाते.